सिडकोतील विभागीय अधिकाऱ्याचा मुजोरपणा

सिडको | सागर चौधरी

‘केवळ मला ओळखले नाही’ म्हणून राग आल्याने मनपा विभागीय अधिकाऱ्याने एका जेष्ठ महिला शिक्षिकेस अपमानित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील सिडको भागांत हा प्रकार घडला आहे.

कौटुंबिक जबाबदारी सांभाळत अध्यापन देण्याचे काम करत असताना अतिरिक्त भार म्हणून शिक्षक रविवारी सुट्टीच्या दिवशी बी.एल.ओ. म्हणून नाशिक महापालिका हद्दीत विविध ठिकाणी कामकाज करत होते. सिडकोतील अभिनव शाळेतल्या एका केंद्रावर सिडकोचे विभागीय अधिकाऱ्यांनी अचानक भेट दिली. यावेळी उपस्थित शिक्षक आपल्या कामात व्यस्त होते. दरम्यान :केवळ त्यांना ओळखले नाही’ म्हणून एका जेष्ठ महिला शिक्षिकेला चारचौघांसमोर मॅनर्स काढून अपमानित केल्याचा प्रकार घडला. सदर बाब उपस्थित सर्व शिक्षकांच्या चांगली जिव्हारी लागली.

यासंदर्भात त्यांनी दुसऱ्या दिवशी सिडको मनपा विभागीय कार्यालयात जाऊन विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी देखील त्यांना तशीच वागणूक मिळाली. कार्यालयातून बाहेर आल्यानंतर सदर प्रसंग इतर शिक्षकांना सांगताना ती महिला शिक्षिका ढसाढसा रडली.

दरम्यान या घटनेमुळे विद्यार्थी, शिक्षक- शिक्षिका व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सदर विभागीय अधिकाऱ्यावर तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.