एसटीची बस सेवा तुरळक, खेड्यापाड्यातील प्रवाशांचा काळीपिवळीने प्रवास

नाशिक । प्रतिनिधी
गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. २८ तारखेला या आंदोलनाला ९० पूर्ण झाले असून महामंडलच्या इतिहासातील सर्वात मोठे आंदोलन असल्याचे सांगितले जात असताना अद्यापही यावर ठोस निर्णय झाला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

दरम्यान संप सुरु असला तरी गेल्या काही दिवसांपासून संपाला डावलून एसटी महामंडळाने बस सेवा सुरु केल्या आहेत. कंत्राटी चालक आणि काही कामावर परतलेल्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर काही प्रमाणात एसटी बसेस सुरु आहेत. नाशिक जिल्ह्यात एकूण ८७१ बसेस असून सध्या १८०बसेस रस्त्यावर धावत आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने हे पाऊल उचलले आहे.

नाशिक जिल्ह्यातील १३ आगारातील सुमारे साडेतीन हजाराहून अधिक जास्त कर्मचारी प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी झाले आहेत. नाशिक ०१ आणि पंचवटी आगारातील आंदोलन केंद्रस्थानी आहे. एसटी महामंडळाने मात्र खाजगी कर्मचाऱ्यांची भरती करत एसटी चाके फिरायला सुरवात झाली आहे. मात्र एसटी महामंडळाच्या गाड्या काही प्रमाणात सुरु झाल्या असल्या तरी वेळापत्रक मात्र कोलमडून पडले आहे. गाड्यांची संख्या पुरेशी नसल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना अजूनही खासगी वाहनांचाच वापर करावा लागत आहे.

सध्या शहरी भाग परिसरात एसटी महामंडळाने बस सेवा सुरु केली आहे. मात्र नाशिक लगतच्या खेड्यापाड्यातील प्रवाशांसाठी खाजगी काळी पिवळी जीप तसेच इतर वाहतुकीच्या साधनांचा वापर केला जात आहे.