इगतपुरीत दोन गटात तुफान राडा, एकाचा खून

इगतपुरी । प्रतिनिधी
इगतपुरीत गँगवारचा भडका उडाला असुन पूर्ववैमनस्यातून एकाचा खून तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास दोनगटात तुफान राडा झाला असुन यात एकाचा खुन झाला तर एक जन गंभीर झाला आहे. या घटनेमुळे इगतपुरीचे नागरिक दहशतीखाली असुन इगतपुरीच्या बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद करण्यात आली.

दरम्यान या घटनेनंतर इगतपुरी शहरात संचारबंदी लागु करण्यात आली. या घटनेनंतर राज्य राखीव दलाच्या तुकड्याना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपअधिक्षक अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी भेट देत परीस्थीती नियंत्रणात आणली.

या बाबत माहिती अशी की, इगतपुरी शहरातील गायकवाड नगर येथील डेव्हीडगँगची शहरात मोठी दहशत आहे. गेल्या पाच सहा वर्षापासुन या गँगचा दरारा असुन या आधीही अनेक वेळा या गँगच्या गुन्ह्याच्या घटना समोर आल्या आहेत. शुक्रवार (दि. २८) रोजी नांदगावसदो येथील एका गटाकडुन पूर्ववैमनस्यातून गायकवाड नगर येथील डेव्हीड गँगमध्ये तुफान हाणामारी झाली. या मारहाणीत राहुल साळवे (वय २५, रा. मिलिंदनगर) मृत्यु झाला. मयत राहुल साळवे वर अनेक पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. तर मॅकवेल उर्फ काउ हा गंभीर जखमी झाला आहे.

या घटनेत दंगलखोरांनी गायकवाड नगर मधील अनेक चारचाकी, दुचाकीची व घरातील सामानाची मोठया प्रमाणावर नुकसान केली. पोलीसांनी घटनास्थळावरुन ९ दुचाकी जप्त केल्या. इगतपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.