तब्बल दीड तासानंतर गांधीधाम पुरी एक्सप्रेसची आग आटोक्यात

नाशिक । प्रतिनिधी
नंदूरबारमध्ये (Nandurbar) गांधीधाम पुरी एक्सप्रेसला (Gandhidham Puri Express) आग लागल्याची घटना घडली. यामुळे नंदूरबार स्थानकात एक्सप्रेस पोहोचण्यापूर्वीच भीषण आग (Fire) लागल्याने भीतीने प्रवाशांची गाळण उडाली होती. तब्बल दीड तासानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

दरम्यन आज सकाळच्या सुमारास हि घटना घडली. आज सकाळी गांधीधाम पुरी एक्सप्रेस नंदूरबार स्थानकात येत असताना अचानक एक्सप्रेसच्या पॅन्ट्रीच्या डब्याला आग लागली. पॅन्ट्रीच्या डब्यात जेवण साहित्य, गॅस सिलिंडर आणि इतर साहित्य असल्याने आगीने पेट घेतला. बघता बघता ही आग दुसऱ्या डब्यापर्यंत जाऊन पोहोचली. आगीने रौद्ररुप धारण केले. आगीबरोबर धुराचे लोळही पसरल्याने प्रवाशी हादरून गेले. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी प्रवाशांमध्ये एकच गोंधळ सुरू झाला. आगीची माहिती मिळताच मोटरमननेही गाडी थांबवत प्रवाशांना सतर्क करीत गाडीबाहेर जाण्यास सांगितले.

आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर गांधीधाम पुरी एक्सप्रेसचा आग लागलेल्या डब्याला रेल्वे ट्रॅक वरून बाहेर काढले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यास सुरुवात केली. तब्बल दीड तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. तसेच या एक्सप्रेसमधून प्रवाशांना तात्काळ बाहेर काढण्यात आले आहे. मात्र गेल्या दोन तासापासून वाहतूक ठप्प होती. त्यामुळे अनेक प्रवासी आणि मालवाहतूक गाड्यांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले. सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जलद उपाय योजना सुरू आदेश देण्यात आले आहेत.

या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, आगीचे नेमकं कारण समजू शकलं नाही. या घटनेने रेल्वेमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले.