आपचे स्वप्नील घिया यांच्या आंदोलनाला केजरीवालांचा पाठिंबा

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक येथील आपचे कार्यकर्ते स्वप्नील घिया यांच्या आंदोलनाला दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दिला असून घिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील त्यांनी ट्विट द्वारे दिल्या आहेत.

दरम्यान कोरोना, लॉकडाऊन यामुळे नाशिककरांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत असल्याने शहरातील ८५० चौरस फूट पर्यंतच्या घरांची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्यात यावी, या मागणीसाठी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते स्वप्नील घिया यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर स्वप्निल घिया यांनी ट्विटरच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांना टॅग करत ही माहिती दिली होती.

काही तासानंतर अरविंद केजरीवाल यांनी स्वप्निल घ्या यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाये स्वप्निल! जनहित मे आपके संघर्ष के इस रास्ते पर ईश्वर आपको खूप शक्ती दे! अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. यामुळे घिया यांच्या जन आंदोलनाला अरविंद केजरीवाल यांचा पाठिंबा मिळाला आहे. तर वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्याने घिया याना प्रोत्साहन मिळाले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी आपचे शहराध्यक्ष गिरीश उगले यांच्या नेतृत्वात मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात रहिवासी घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्यासंदर्भात मागणी केली होती. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने घिया यांनी बेमुदत चांदण्यात अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला आहे.