नाशिक । प्रतिनिधी
गुरुवारी उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी देशातीत पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे (Petrol-Diesel Rates) दर जाहीर करण्यात आले. मात्र नाशिकमध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
विधानसभा निवडणूक (Assembly elections) होताच पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये वाढ होईल असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र आज देखील इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. चार नोव्हेंबर २०२१ रोजी पेट्रोल, डिझेलवरील टॅक्स कमी करण्यात आल्याने पेट्रोल प्रति लिटर पाच रुपये तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले होते, त्यानंतर इंधनाच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाचे दर १२० डॉलर प्रति बॅरलच्या पुढे पोहोचले आहेत. कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने पेट्रल, डिझेलची दरवाढ अटळी मानली जात आहे. पाच राज्यातील निवडणुका होताच दर वाढविले जातील असा अंदाज होता. मात्र आजही दर स्थिर ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान नाशिकमध्ये आजघडीला पेट्रोलचा दर प्रती लिटर ११०.४० रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर ९३. ३० रुपये एवढा आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे १०९.९८ व १४.१४ रुपये एवढा आहे. पुण्यामध्ये एक लिटर पेट्रलसाठी १०९.६६ रुपये आणि डिझेलसाठी ९२.४२ रुपये आकारले जात आहेत. तर नागपूरमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर ११०.७० रुपये तर डिझेलचा दर ९४.९२ रुपये एवढा आहे.