नाशिकच्या तरुणाला फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवणं पडलं महागात!

नाशिक । प्रतिनिधी

फेसबुकवरील तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे नाशिकमधील तरुणाला चांगलच महागात पडले आहे. सदर तरुणीने पैशांची मागणी केल्यानंतर तरुणाने थेट पोलीस स्टेशन गाठत आपबिती सांगितली. या प्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर अनेक फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअँप वरून पैसे मागण्याचे प्रकार वाढले आहेत. असाच एक प्रकार नाशिकच्या तरुणासोबत घडला आहे. फिर्यादी पुरुषाचे फेसबुकवर खाते आहे. (दि. ०६) मार्च रोजी त्यांना पूनम शर्मा नावाच्या महिलेची रिक्वेस्ट आली. फिर्यादी तरुणाने ती रिक्वेस्ट अक्सेप्ट केली. त्याच्या दोन दिवसांनंतर या तरुणीने तरुणाचा व्हाटसप नंबर घेत त्यावर व्हिडीओ कॉल केला.

मात्र सदर व्हिडीओ कॉल मध्ये एक महीला विवस्त्र अवस्थेत बसुन अश्लिल हावभावाचे कृत्य करत होती. यावेळी हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात येत होता. सदर तरुणास हा व्हिडीओ व्हायरल करण्याची व फेसबुक वरील मित्रांना पाठविण्याची धमकी दिली. तसेच सदर व्हिडीओ इतरत्र न पाठविण्याची धमकी देऊन गुगल पे वर वारंवार पैशांची मागणी केली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.