कोल्हापुरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

नाशिक | प्रतिनिधी

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्यावर हैदराबाद येथे उपचार सुरू होते.

गेल्या वर्षी जाधव यांना करोनाची बाधा झाली होती. तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावत गेली होती. प्रकृतीकडे दुर्लक्ष करून अनेक कामांमध्ये हिरीरीने सहभागी होत होते. पाच दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या अन्ननलिकेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. पण याच वेळी त्यांचा रक्तदाब कमी झाला. तो शेवटपर्यंत नियंत्रणात आला नाही. अखेर काल मध्यरात्री त्यांचे निधन झाले.

आमदार चंद्रकांत जाधव हे कोल्हापुरातील एक प्रथितयश उद्योजक होते. त्यांनी गोशिमा या उद्योजकांच्या संघटनेवर काम करताना उद्योजकांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. सरकार दरबारी त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले होते. कोल्हापुरातील फुटबॉल खेळाडूंना ते सतत मदत करत असत. त्यामुळे फुटबॉल संघाचा आधारस्तंभ म्हणून त्यांची क्रीडा क्षेत्रात ओळख होती.