नाशिक । प्रतिनिधी
कोरोनाच्या दुसर्या लाटेत ऑक्सिजन अभावी जी परिस्थिती निर्माण झाली होती, ती पुन्हा उद्भवू नये म्हणून आता नाशिक जिल्ह्यात सरकारी रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयांना पुरवठा केला जाऊ शकतो, इतक्या मोठ्या प्रमाणाचा ऑक्सिजन प्लँट नाशिक महानगर पालिकेने झाकीर हुसेन रुग्णालयातील आवारात उभारला आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत वाढलेल्या ऑक्सिजनच्या मागणीने आरोग्य व्यवस्था काय, रुग्ण काय अणि रुग्णांचे नातेवाईक काय सर्वांचीच तारांबळ उडाली होती. सर्वत्र ऑक्सिजन बेड मिळवण्यासाठी चाललेली धडपड नाशिकने अगदी जवळून अनुभवली. त्यात बेड मिळाले तर ठीक नाहीतर अक्षरशः डोळ्यासमोरच आपल्या कुटुंबातील सदस्यांना ऑक्सिजन अभावी तडफडून मरताना बघण्याच्या हतबल परिस्थितीतून बरेच जण गेले आहेत.अशातही ज्यांना ऑक्सिजन बेड मिळाले, त्यांना अचानक हॉस्पिटल मधील ऑक्सिजन पुरवठा संपल्याचा धक्का बसायचा.
त्यामुळे दुसऱ्या लाटेत ऑक्सीजन अभावी अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. काहींनी घरात, हॉस्पिटलच्या दारात तर अनेकांनी वाहनातच आपला जीव गमविल्याच्या घटना पाहायला मिळाल्या. मात्र, ती परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणून आता नाशिक जिल्ह्यात सरकारी रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयांना पुरवठा केला जाऊ शकतो, इतक्या मोठ्या प्रमाणाचा ऑक्सिजन प्लँट नाशिक महानगर पालिकेने उभारला आहे.
नाशिक महापालिकेकडे या पूर्वी केवळ १३ मेट्रिक टन इतक्या ऑक्सिनची क्षमता होती. मात्र, आता पालिकेने तब्बल ३ कोटी रुपये खर्च करून १४० मेट्रिक टन क्षमतेचा ऑक्सिजण प्लँट उभारला आहे, हा प्लँट महाराष्ट्रातील सर्वात मोठा सरकारी ऑक्सिजन असलेला प्लँट असेल जो की नाशिकच काय तर उत्तर महाराष्ट्राला देखील ऑक्सिनज पुरवठा करू शकेल असा दावा पालिका आयुक्तांनी केला आहे.
दुसर्या लाटेत हॉस्पिटल मधील ऑक्सिजन पुरवठा संपला म्हणून रुग्णांना घरी घेऊन जा, अस सांगण्याची परिस्थिती देखील हॉस्पिटल प्रशासनावर आली होती. दरम्यान दुसर्या लाटेत ज्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन कित्येकांचे जीव गेले होते. त्याच झाकीर हुसेन रुग्णालयात अंदाजे 140 मेट्रिक टन क्षमतेचा हा ऑक्सिजन प्लॅन्ट उभारला जात आहे. त्यामुळे तिसर्या लाटेच्या अनुषंगाने ऑक्सिजनसाठी सुरू झालेल्या नाशिक मनपा प्रशासनाच्या तयारीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.