Video : घरात घुसून बिबट्याचा हल्ला, आजीच्या थरारक सामन्यामुळे वाचला नातवाचा जीव

नाशिक | प्रतिनिधी
दुगारवाडी येथे पुन्हा बिबट्याचा हल्ल्याची थरारक घटना घडली आहे. घरात घुसून हल्ला करणाऱ्या बिबट्याला मात्र आजीच्या धाडसामुळे धूम ठोकावी लागली आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील दूगारवाडी येथे काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी बिबट्याने थेट घरात प्रवेश करत एका लहान मुलांवर हल्ला केला आहे.

https://www.youtube.com/watch?v=0FSjxjx9WQ8

दरम्यान या हल्ल्यात रोशन बुधा खाडम हा सहा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सायंकाळी सात वाजता आजीसह नातू रोशन घरात असताना अचानक बिबट्याने घरात प्रवेश केला. यात रोशन वर हल्ला करत त्यास मानेला दात लावत बाहेर फरफटत नेत होता. यावेळी आजीने बिबत्याशी दोन हात करत बिबट्याला पळता भुई थोडी केली.

आजीने आरडाओरड केल्याने काही क्षणात गावकरी देखिल जमा झाले. यानंतर लागलीच रोशन यास रात्री उशिरा नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

इगतपुरी तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला असताना आता त्र्यंबकेश्वर तालुक्यात मोर्चा वळविल्याने नागरिकांमध्ये धास्ती वाढली आहे. दूगारवाडी परिसरात नोव्हेंबर महिन्यात देखील दोन लहान मुलांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर परिसरात पिंजरा लावण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.