ऑल द बेस्ट! आजपासून दहावीची परीक्षा सुरु, ‘या’ विद्यार्थ्यांना विशेष सवलत

नाशिक | प्रतिनिधी

राज्यभरतातून महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेतल्या जाणारी इयत्ता दहावीची परिक्षा (Maharashtra Board SSC Exams 2022) आजपासून सुरु होत आहे. सुमारे १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा या परीक्षांचे आयोजन करताना अत्यंत काटेकोरपणाने विचार करण्यात आला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी सुमारे मुख्य केंद्र आणि उपकेंद्र अशा एकूण २१ हजार ३८४ केंद्रांवर परीक्ष होत आहे.

राज्य मंडळाने एका परिपत्रकाद्वारे माहिती देताना सांगितले की, राज्य मंडळ प्रतीवर्षी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेत असते. पाठीमागील वर्षी मात्र त्यात खंड पडला. कोरोनामुळे परीक्षा होऊ शकल्या नाहीत. परिणामी अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. त्यामुळे या परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाच्या वर्षी इयत्ता बारावीची परीक्षा ४ मार्चपासून सुरु झाली. तर आजपासून इयत्ता दहावीची परीक्षा सुरु होत आहे. कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी काही सवलतही देण्यात आली आहे. जसे की, एखाद्या विद्यार्थ्याला कोरोना व्हायरस संसर्गाचे निदान झाल्यास अथवा इतर काही वैद्यकीय अथवा अपरीहार्य कारणांमुळे विद्यार्थ्याला प्रात्यक्षिक, लेखी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा देता आली नाही तर त्यासाठी ०५ ते २२ एप्रील २०२२ या काळात परीक्षा घेतली जाईल. तसेच, जुलै-ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षेचे आयोजन करण्याबाबत राज्य मंडळ नियोजन करत आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या परिपत्रकात दिली आहे.