Home » अखेर सोमवारपासून ‘शाळेला चाललो आम्ही’

अखेर सोमवारपासून ‘शाळेला चाललो आम्ही’

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

कोरोनाच्या दहशतीखाली बंद करण्यात आलेल्या शाळा आता पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान याबाबत काल शालेय विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यावर शासनाने याला हिरवा कंदील देत मुलांसाठी शाळेचे दरवाजे उघडले आहे.

दरम्यान सरकारने शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हा प्रशासनाकडे दिला आहे. येत्या २४ जानेवारीपासून शाळा सुरु होणार असल्याचे निश्चित झाले आहे. यामध्ये जेथे रूग्णसंख्या कमी आहे आणि स्थिती आटोक्यात आहे, कोरोनच्या त्रिसूत्रीचे पालन करता येईल, अशा ठिकाणी पहिली ते बारावीसोबतच शिशू वर्ग देखील सुरू करण्याला परवानगी असल्याचे शालेयशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची अनुमती आवश्यक असणार आहे. तसेच १५-१८ वयोगटातील मुलांचे शाळेत येऊन लसीकरण करून घेण्यासाठी देखील शालेय विभाग आरोग्य विभागाकडे प्रस्ताव देणार असल्याची माहिती दिली आहे. पुन्हा शाळा सुरू करण्यासाठी पूर्वीप्रमाणेच नियमावली असणार आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण केलेले असावे असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान शाळा बंद झाल्यांपासून शहरी तसेच ग्रामीण भागातून काही पालक, शिक्षक वर्ग आणि शिक्षक संघटना यांच्या माध्यमातून शाळा सुरु करण्यासंदर्भात वेळोवेळी मागणी करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या नियमांना अनुसरून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागात इंटरनेट, वीज यांची २४ तास अखंडीत सेवा उपलब्ध नसल्याने ऑनलाईन वर्ग सुरू ठेवण्यामध्ये अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे काही लोकप्रतिनिधी, पालक यांच्याकडून वारंवार ऑफलाईन वर्ग सुरू करण्याची मागणी होत होती. त्यापार्श्वभूमीवर शिक्षण थांबू नये म्हणून मुलांसाठी ऑनलाईन प्रमाणेच ऑफलाईन वर्ग देखील सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!