वॉर्निंग संपली आता डायरेक कारवाई! नाशिक पोलिस ‘ऍक्शन मोडवर’

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमध्ये एकामागोमाग एक होणारे अपघात, त्यात हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांचा जाणारा जीव पाहून पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) अधिक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात आजपासून तीव्र हेल्मेटसक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांनी घराबाहेर पडताना सोबत हेल्मेट ठेवावेच. अन्यथा तुम्हाला मोठा भुर्दंड बसण्याची शक्यता आहे.

नाशिक शहरात आजपासून हेल्मेट नसणाऱ्या वाहनधारकांचा थेट परवाना रद्द करण्याची दंडात्मक कारवाई पोलिस प्रशासनाकडून करण्यात येते आहे. आज पासून जरी हेल्मेट सक्ती सुरू केली असली तरी या हेल्मेट सक्तीच्या पार्श्वभूमीवर मागील दोन दिवस हेल्मेट नसणाऱ्या वाहनधारकांचे समुपदेशन देखील करण्यात आले होते.

नाशिक पोलिसांनी सुरु केलेल्या हेल्मेट सक्ती मोहिमेला चांगलाच वेग आला आहे. आता कारवाईनुसार हेल्मेट नसल्यास वाहनधारकास ५०० रुपये दंड आकारला जाईल, मात्र दुसऱ्यांदा विनाहेल्मेट आढळल्यास १००० रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी त्या वाहनधारकांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित केला जाणार आहे. दरम्यान अचानकपणे वाहनधारकांची तपासणीही करण्यात येणार आहे.

नाशिक शहरात वाढत्या अपघाताची संख्या लक्षात घेता याआधीही नाशिक पोलिसांकडून ‘ नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहीम, त्यानंतर विनाहेल्मेट वाहनधारकांवर कारवाई करत ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क येथे त्यांचे समुपदेशन, त्यानंतर ‘हेल्मेट नाही तर सहकार्य नाही’ याद्वारे विनाहेल्मेट वाहनधारकांना शासकीय कार्यालय, तसेच खासगी कार्यालयात प्रवेश बंद असे अनेक प्रयोग करण्यात आले होते.

तरीही दुचाकीधारकांकडून हेल्मेट वापरण्याचे टाळले जात असल्याने हा आता पोलिस आयुक्त दीपक पांडे नवीन हातकंडा आजमावत हेल्मेट सक्ती वर ठाम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता पोलीस आयुक्तांचा हा नवीन उपाय किती परिणामकारक राहील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.