नाशिक । प्रतिनिधी
एकीकडे नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आता लहान बालकेही बाधित आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात दोन आठवड्यांत साडेनऊशे बालके कोरोना पॉसिटीव्ह आढळून आल्याचे समोर आले आहे. मुलांचे आईवडीलच करोनाचे वाहक ठरत असल्याचे निरीक्षण आरोग्य यंत्रणेने नोंदविले आहे. त्यामुळे बालकांवर घरगुती उपचार न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करा, असे आवाहन बालरोगतज्ज्ञांनी केले आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये शून्य ते १२ वयोगटातील बालकेही मोठ्या प्रमाणावर बाधित होत असल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २१ हजारच्या आसपास बालके कोरोना बाधित आढळून आली आहेत. यातील काही बालकांना उपचारांसाठी हॉस्पिटल्समध्ये दाखल करावे लागले असून, काही बालकांना घरी सोडण्यात आले आहे. एकीकडे तिसऱ्या लाटेला सुरवात झाली असताना लहान बालकांवर परिणाम दिसून येत असल्याने पालकांच्या चिंता वाढली आहे. यासाठी पालक हॉस्पिटल गाठ असून रात्र दिवस उपचार सुरु असल्याने बालक कोरोना मुक्त होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
दरम्यान तिसऱ्या लाटेत बालकांना कोरोना होत असल्याने पालक संभ्रमात आहेत. सध्या बालकांना सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, थंडी-ताप, डोकेदुखी आणि जुलाबासारखी लक्षणेही दिसून येत आहेत. मात्र पालकांचे लसीकरण झाल्याने त्यांना लक्षणे नाहीत. परंतु, बालकांना लक्षणे दिसून येत असल्याने पालक चिंता व्यक्त करीत आहेत. दोन दिवस तीव्र लक्षणे असल्यास कोव्हिडची शक्यता अधिक असल्याची माहिती डॉक्टरांकडून दिली जात आहे. मात्र औषधोपचाराने घरीच बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
तर दुसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे. कारण बालकांचे लसीकरण झालेले नाही. तसेच विविध कारणांसाठी बालकांनी घराबाहेर पडणे. रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्यास बालकांवर संसर्गाचा प्रभाव अधिक दिसून येत आहे. महत्वाचे म्हणजे पालकांमुळेच बालकांना संसर्गाचे प्रमाण अधिक असून करोना प्रतिबंधक नियमांचे पालन होत नसल्याने पॉझिटिव्ह येत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.