‘शिवतीर्थ’वर ठाकरे आणि फडणवीस यांच्यात खलबत

नाशिक । प्रतिनिधी

राजकारणात कोण कधी कुणाला भेटेल सांगता येत नाही. तर कोण कोणाचा शत्रू हेही सामान्य जनतेला कळत नाही. त्यामुळे राजकारण भल्याभल्यांना सुधारत नाही. आता राजकीय क्षेत्रात कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच शिवतीर्थावर भेट झाली. त्यामुळे या भेटीनंतर तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

दरम्यान काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या महापालिका आणि विधानसभा निवडणुकासाठी मनसे-भाजपाची मोर्चे बांधणी तर नसेल? अशी चर्चा सध्या सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि फडणवीस या दोघांमध्ये अनेकदा भेटीगाठी झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवरदेवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या नव्याने बांधण्यात आलेल्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे.

त्यामुळे भाजपा आणि मनसे यांच्यामध्ये युती होणार यावर ही भेट म्हणजे शिक्कामोर्तब असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांकडून या भेटीविषयी जाहीर चर्चा करण्यात आलेली नसली, तरी या भेटीदरम्यान दोन्ही पक्षांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याविषयी तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

दरम्यान राज ठाकरे यांच्या शिवतीर्थांवर अनेक राजकीय मंडळींनी मागील दिवसांत भेटी दिल्याचे आढळून आले आहे. यात देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, प्रसाद लाड विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे ‘शिवतीर्थ’वर राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे.