नाशिक । प्रतिनिधी
मालेगावमधून तिरंगा यात्रेला निघालेल्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले असून यात्रेतील मोर्चेकरी मात्र मोर्चात सहभागी होण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
मालेगावमध्ये एमआयएमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. यावेळी यात्रा सुरु असताना पोलिसांनी काही कार्यकर्त्याना स्थानबद्ध केले. यावेळी कार्यकर्त्यानी विचारणा केली असता यात्रेत आंदोलन, निदर्शने होऊ नये यासाठी त्यांना स्थानबद्ध करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. खालिद परवेज यांच्यासह कार्यकर्त्यांनां त्यांच्याच फार्महाऊसवर स्थानबद्ध केले आहे. यात्रेत सहभागी होण्यासाठी आलेले मोर्चेकरी मात्र यात्रेत सहभागी होण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे या तिरंगा यात्रेला मालेगांव मध्यचे आमदार मुफ्ती इस्माईल अनुपस्थित असल्याचे दिसून आले. एका स्थानिक कार्यकर्त्याने सांगितले कि आमदार मालेगावात नसल्याने हजर होऊ शकले नाही.
दरम्यान कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केल्यानंतर धुळ्याच्या एमआयएमच्या आमदारांनीही हजेरी लावून कार्यकर्ते यांना मोकळे सोडण्याची मागणी केली. तसेच धरणे आंदोलनाला बसत जोरदार घोषणाबाजी केली. मात्र पोलीस त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे पाहायला मिळाले.