महापरिनिर्वाण दिन : नाशिक जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी बाबासाहेंबाच्या अस्थींचे स्मारक स्तूप

नाशिक । प्रतिनिधी

आज सहा डिसेंबर. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. आजच्या लाखो अनुयायी दादर येथील चैत्यभूमीला भेट देतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे चैत्यभूमीवर जाण्यास प्रशासनाकडून मज्जाव करण्यात आला आहे. मात्र भीम अनुयायांना नाशिक जिल्ह्यातील सैय्यद पिंपरी येथे बाबासाहेबांच्या अस्थी असून या ठिकाणी स्मारक स्तूप उभारण्यात आले आहे.

समाजाला समृद्ध करणाऱ्या, समाजाचा उद्धार करणाऱ्या महान व्यक्तींच्या पश्तात त्यांच्या प्रत्येक आठवणी, त्यांनी वापरलेल्या वस्तू समाजासाठी मौल्यवान ठेवा असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तर अवघ्या जगाचे प्रेरणास्थान. दलितांच्या उद्धारासाठी स्वतःचे जीवन अर्पण करणाऱ्या या महामानवाचा सहवास, सान्निध्य, मार्गदर्शन, मैत्र लाभलेल्या व्यक्तीही तितक्याच नशीबवान म्हणता येतील. यापैकीच एक म्हणजे सैय्यद पिंपरी येथील पी. एल. लोखंडे ! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर दादर चौपाटी येथे अंत्यसंस्कार करण्यात आल्याने तेथील भूमीला चैत्यभूमी असे संबोधले जाते. मात्र डॅा बाबासाहेब आंबेडकर यांचे अंगरक्षक श्री पी.एल.लोखंडे यांनी मौजे सय्यद पिंपरी ता जि.नाशिक येथे जतन करुन ठेवल्या आहेत. लोखंडे आणि बाबासाहेबांचे सख्य एवढे होते की, डॉ. बाबासाहेबांच्या निधनानंतर काही मोजक्याच जणांना त्यांच्या अस्थी जपून ठेवण्यासाठी देण्यात आल्या. सैय्यद पिंप्रीच्या लोखंडे यांना हे भाग्य लाभले. त्यामुळे चैत्यभूमीला जाणे शक्य होत नाही ते भीम अनुयायी या ठिकाणी भेट देत असतात. हा स्मारक स्तूप महापरिनिर्वाण दिनी अनुयायांच्या अभिवादनाकरिता खुला केला जातो.

दरम्यान ज्यावेळी बाबासाहेबांचे निधन झाले त्यानंतर चैत्यभूमी येथे १९७१ मध्ये त्यांच्या अस्थी असलेले स्मारक बांधण्यात आले. मात्र तत्पूर्वीच म्हणजे १९५८ मध्येच सैय्यद पिंप्री येथे स्मारक उभारण्यात आले असल्याने चैत्यभूमी इतकेच महत्त्व या स्थानाला असल्याचे येथील अनुयायांचे म्हणणे आहे. त्यामुळे या स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या दहा वर्षांपासून येथील रहिवासी प्रयत्न करीत आहेत. तत्कालीन खासदार दादासाहेब गायकवाड यांच्या हस्ते येथील स्मारकाचे उद्घाटन झाले होते, तर आंबेडकरांचे पुतणे मुकुंदराव आंबेडकर या सोहळ्याला उपस्थित होते. मुकुंदराव आंबेडकर यांच्या हस्ते वृक्षारोपण केलेले बोधिवृक्ष आजही या ठिकाणी आहे.

विशेष म्हणजे लोकवर्गणीतून स्तूप आकारास आला आहे. पी. एल. लोखंडे यांनी अस्थी मिळवून त्या सय्यद पिंप्री या आपल्या गावी आणल्या. गावात उभारण्यात आलेला अस्थिस्तूप, त्यासमोरच असलेले बुद्धविहार आणि बोधिवृक्ष यामुळे या भूमीचे महत्त्व मोठे आहे. या भूमीचे पावित्र्य जपले जावे यासाठी येथील तरुणांनी सोशल मीडियावर गेल्या काही वर्षांपासून मोहीम सुरू केली आहे, मात्र राजकीय पातळीवर हा विषय अजूनही दुर्लक्षित आहे.