मुंबई | प्रतिनिधी
खासदार छत्रपती संभाजीराजे शिवसेनेत जाण्याची शक्यता असून उद्या याबाबत ते आपली भूमिका मांडणार आहेत.
संभाजीराजे गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आपली भूमिका मांडत आहेत. त्यासाठी अनेकवेळा आंदोलने झाली. तसेच मराठा समाजातील अनेक दिग्गजांच्या भेटी घेत होते. राज्यभरातील अनेकांना भेटून त्यांनी चर्चा केली.
खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी याबाबत नुकतंच काही तसापूर्वी ट्विट केले आहे. यामध्ये ते म्हणतात की, मराठा आरक्षण व समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्यांबाबत समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचार विनिमय करून मी माझी पुढील दिशा ठरविलेली आहे, याबाबत उद्या, दि. १४ रोजी स. ११ वा. मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन ती स्पष्ट करणार आहे.’ अशा आशयाचे ट्विट केले आहे.
दरम्यान छत्रपती संभाजी राजे हे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते पत्रकार परिषदेत काय भूमिका काय मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.