नांदगावमध्ये राष्ट्रवादीचे वाढले भुज’बळ’, कांदेच्या गोटात चिंता

नाशिक । प्रतिनिधी
गेले दोन वर्षे कोरोनामुळे अडचणीत गेले त्यामुळे अनेक विकास कामांना ब्रेक लागला होता. आता विकासाची ही कामे आता पुन्हा जलद गतीने सुरू झालेली असून नांदगाव मतदारसंघात रखडलेल्या प्रकल्पांना न्याय देण्यात येईल असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान नांदगाव येथे भुजबळांच्या उपस्थितीत नांदगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे या मतदारसंघात भुजबळांची ताकद वाढली असून कांदेच्या गोटात मात्र चिंता व्यक्त केली जात आहे.

नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय पवार, मालेगाव येथील भाजपचे पदाधिकारी अनिल वाघ, संजय वाघ तसेच अशोक पवार, बाळासाहेब चव्हाण, विठल आहेर, हिरामण वडगर, सुधाकर पवार, मच्छिंद्र सातपुते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत येवला संपर्क कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.

यावेळी माजी आमदार पंकज भुजबळ, ऍड.रवींद्र पगार, नांदगाव तालुकाध्यक्ष विजय पाटील,नांदगावचे शहराध्यक्ष बाळकाका कलंत्री, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर,अरुण थोरात, जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, राजेंद्र नहार, सोपान पवार, दत्तू पवार, राजाभाऊ लाठे, अमित पाटील, अमजद पठाण, मोहन शेलार, विनोद शेलार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, पक्षात काम करत असताना मतभेद असतील ते चर्चेतून सोडविले जात असतात अगदी टोकाचे निर्णय घेऊ नये. माजी आमदार पवार आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे तालुक्यात तसेच जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षात सन्मानाने वागणूक दिली जाईल. सर्वांचे प्रश्न सोडविण्यासाठी जीवच रान असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. ते म्हणाले की, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष काम करतो त्यामुळे समाजकारणाला प्राधान्य देऊन नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे. तसेच आगामी जिल्हा परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी माजी आमदार संजय पवार म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांपूर्वी माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला होता. आज अधिकृत प्रवेश पक्षात करत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी ऍड.रवींद्र पगार म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षात योग्य तो सन्मान दिला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत लोकशाही पद्धतीने चालतो. त्यामुळे कुणालाही यात डावलण्यात येणार नाही. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सर्वांनी जोमाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.