राज्यातील “हे” शेतकरी होणार कृषी पुरस्कारांनी सन्मानित !

मुंबई / प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाचा बहुप्रतीक्षित कृषी विभागाचा कृषी पुरस्कार सोहळा यंदा नाशिक मध्ये होणार आहे. राज्यातील कृषि, फलोत्‍पादन आणि संलग्‍न क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्‍पादन-उत्‍पन्‍नवाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने विविध कृषि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे हा पुरस्कार सोहळा रखडला होता. अखेर २ मे रोजी नाशिक (Nashik)येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.

हा पुरस्कार सोहळा राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(Bhagatsingh Koshyari) यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakre)यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यात सन २०१७, २०१८ आणि २०१९ या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे(Dadaji Bhuse) यांनी बुधवारी दिली.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दादाजी भुसे यांनी हि माहिती दिली. गेल्या दोन वर्षात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कृषि विभागाचे (Agriculture Depaartment of Maharashtra) पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्हते, तो कार्यक्रम आता २ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. कृषि, फलोत्‍पादन आणि संलग्‍न क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्‍पादन-उत्‍पन्‍न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषि विस्‍तारामध्‍ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्‍यक्‍ती, संस्‍था, गट, अधिकारी-कर्मचाऱ्यांना कृषि विभागामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धा विजेते, पद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील कृषि सेवारत्न अशा विविध पुरस्कारांनी सन्‍मानित करण्‍यात येणार आहे.

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात (MUHS) २ मे रोजी सकाळी ११ वा. तीन वर्षातील १९८ पुरस्कारार्थ्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्‍यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात सन्मान केले जाणार आहे. कार्यक्रमला उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात(Balaasaheb Thorat), नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ(Chagan Bhujbal), विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal), केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार(Dr. Bharti Pawar), कृषिमंत्री दादाजी भुसे, रोजगार हमी, फलोत्‍पादन मंत्री संदिपान भुमरे(Sandipaan Bhumre), कृषि राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम(Dr. Vishwajit Kadam), फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे(Aditi Tatkare) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पुरस्‍कारार्थींना रोख रकमेसोबत स्‍मृतीचिन्‍ह, सन्‍मानपत्र प्रदान करण्यात येतील. सर्व पुरस्‍कारप्राप्‍त शेतकरी साधन व्यक्ती (रिसोर्स पर्सन) म्‍हणून कृषि विभागातील विविध योजनांमध्‍ये कार्य करणार असल्याचेही कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले.