चला फिरायला! जिल्ह्यातील पर्यटन स्थळे झाली खुली!

नाशिक | प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या पर्यटन स्थळांवरील निर्बध उठवण्यात येत असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. ते यावेळी म्हणाले की कोरोना रुग्णसंख्या घटत आहे. त्यामुळे पर्यटनस्थळे खुली करण्यात येत आहेत. पॉझिटिव्हीटी रेट ४१ टक्के वरून २७ टक्के आला आहे आणि म्युकरमायकोसीसचा एकही ही रुग्ण नसल्याने पुन्हा एकदा पर्यटन स्थळ चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे.

आज झालेल्या कोरोना आढावा बैठकीत हा निर्णय झाला असल्याचे पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना पालकमंत्र्यांनी सांगितले आहे. पर्यटनासोबतच शहरातील सर्व वसतीगृह देखील सुरू होणार असून आता विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहता येणार आहे.

ते पुढे म्हणाले की, अद्यापही अनेक नागरीकांनी लस घेतली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण घेणे आवश्यक आहे. मोफत आहे, तोवर लसीचा फायदा घ्या, जन्मभर लस फुकट मिळणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.