नवीन नाशिकमधून दोनशे किलोचे प्लास्टिक जप्त, दुकानदारावर कारवाई

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या आदेशाचे पालन करून नवीन नाशिक विभागीय कार्यालया मार्फत पवन नगर मधील एका व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात आली. विभागीय अधिकारी डॉ.मयुर पाटील व विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नवीन नाशिक घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान रविवारी झालेल्या कारवाईत सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणेबाबत १४ केस, त्यामध्ये तब्बल ७ हजार रुपयांचा दंड तसेच प्रतिबंधीत प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणेबाबत ४ केस, त्यामध्ये तब्बल २० हजार रुपयांचा दंड तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणेबाबत २ केस, एक हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच आज सकाळी गुप्त माहितीच्या आधारे प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई करत तब्बल 200 किलो प्लास्टिक पिशवी पवन नगर भाजी मार्केट मधून जप्त करण्यात आले. याबाबत विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांनी अधिक माहिती दिली.

शहरात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महापालिका प्रशासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईसाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून त्यांच्यामार्फत गेल्या काही दिवसांपासून शहरात कारवाई सुरू आहे. त्या अनुषंगाने नवीन नाशिकमधील काही ठिकाणी विभागीय कार्यालया मार्फत कारवाई करण्यात आली. यामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा साठा सापडला असून तो जप्त करण्यात आला आहे. तरं संबंधित व्यापाऱ्यांवर दंड स्वरूपात रक्कम वसूल करण्यात आली आहे.

दरम्यान, सदर मोहिमेत बी.आर.बागुल, रावसाहेब मते, दीपक बोडके, रावसाहेब रुपवते, जितेंद्र परमार, सुशील परमार, राहुल गायकवाड, विशाल आवारे, संतोष गायकवाड तसेच स्वच्छता मुकादम दिपक लांडगे, अशोक दोंदे, अजय खळगे, संतोष बागूल, अविनाश गांगुर्डे, राजाराम गायकर व वाहनचालक योगेश जाधव यांनी सदर कारवाई केली आहे.