नाशिक । प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचना अखेर उद्या म्हणजेच एक फेब्रुवारीला जाहीर होणार आहे.अनेक दिवसांपासून या प्रभाग रचना जाहीर होण्याकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिलेले होते.
मंगळवारी (दि. 01) सकाळी या प्रभाग रचना जाहीर होणार असल्याने इच्छुकांची प्रतीक्षा आता संपली आहे. उद्या सकाळी 11 वाजता नाशिक महापालिकेच्या मुख्यालयासह पंचवटी, सातपूर, नाशिकरोड, नवीन नाशिक, नाशिक पूर्व आणि पश्चिम अशा महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयात या रचनेचे नकाशे प्रदर्शित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नाशिकच्या इतिहासात प्रथमच आरक्षण जाहीर झालेलं नसताना आधी प्रभाग रचना आणि त्यानंतर आरक्षण जाहीर होणार आहे.
या प्रभाग रचना नेमक्या कश्या झाल्या हे ऑनलाइन पाहण्यासाठी महापालिकेच्या ww.nmc.gov.in या संकेतस्थळावरही या रचना अपलोड करण्यात येणार आहेत. ज्या इच्छुक उमेदवारांना प्रभाग रचनेबाबत हरकत असेल अशांना लेखी स्वरूपात महापालिका मुख्यालयात लेखी अर्जाद्वारे हरकती देखील नोंदवता येणार आहे. सद्यस्थितीत नाशिकच्या याच सभागृहात 122 नगरसेवक आहे, मात्र लोकसंख्येच्या विचार करता यंदाच्या वर्षी ही संख्या 11 ने वाढली असून 133 नगरसेवक आता नाशिककरांना सभागृहात पाहायला मिळणार आहे. यात 43 प्रभाग हे 3 सदस्यांचे तर 1 प्रभाग हा 4 सदस्यांचा असणार आहे.
मागील पंचवार्षिक काळात 4 सदस्यीय प्रभाग रचना होती. यंदा ती तत्रिसदस्यीय करण्यात आल्याने अनेक विद्यमान नगरसेवकांना नेमकं कुठून लढायचं हा प्रश्न सतावतो आहे. एकूनच प्रभाग रचना जाहीर झाल्याने इच्छुकांच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. मात्र प्रभाग रचना कशी होते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.