कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन, शिवरायांना दुग्धाभिषेक

नाशिक | प्रतिनिधी
कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधानाच्या निषेधार्थ शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रविवारी आंदोलन करण्यात आले.

यावेळी कार्यकर्त्यांनी पाथर्डी फाटा येथील शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करत निषेध व्यक्त केला.

कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ शुक्रवारी रात्री व्हायरल झाला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट आहे, असे धक्कादायक विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले होते. त्या निषेधार्थ नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार आंदोलन केले.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून अभिवादन केले. त्यानंतर कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी, संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यावरून त्यांचा या घटनेला समर्थन असल्याचे निदर्शनास येते. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली. याची जाण ठेवून केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली.

राजांनी १८ पगड जातींना एकत्र आणत स्वराज्याची स्थापना केली. मुघलांच्या राज्याचा अंत करत हिंदवी स्वराज्य स्थापन केले. देशामध्ये खऱ्या अर्थाने समतेचा विचार रुजवला, आशा थोर राजाच्या पुतळ्याची विटंबना अतिशय निंदनीय आहे.

अपूर्व हिरे म्हणाले की, नरेंद्र मोदी हे छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत आले आहेत. मात्र, त्यांच्या भाजपच्या राज्यात या समाजकंटकांनी हे कृत्य केले. आम्ही छत्रपतींना दैवत मानतो, त्यामुळे केंद्र सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून समाजकंटकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, अनिता भामरे, संजय खैरनार, महेश भामरे, दत्ताकाका पाटील, बाळासाहेब गीते, प्रशांत खरात, योगेश दिवे, मकरंद सोमवंशी, दादा कापडणीस, हर्षल चव्हाण, पुष्पा राठोड, योगिता आहेर, सिम्मी केसी, संगीता सानप, संतोष भुजबळ, विक्रांत डहाळे, अजय पाटील, मनोज हिरे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.