दुर्दैवी! नाशिकरोडच्या महिलेचा कश्यपी धरणात बुडून मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी

एकीकडे नाशिक शहरासह जिल्ह्यात उत्साहात धुळवड साजरी होत असताना कश्यपी धरणात बुडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

योगिता राजेश कांबळे (३०, रा. नाशिक रोड) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कश्यपी धरणावर धुळवड साजरी करण्यासाठी गेलेल्या दोन महिला आणि दोन पुरुष गेले होते. पैकी एका महिला पाण्यात उतरली असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ही महिला पाण्यात बुडाली.

शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना या घटनेने धुलीवंदनाला गालबोट लागले आहे. गिरणारे जवळील कश्यपी धरणावर नाशिकरोड हे कुटुंब धुळवड साजरी करण्यासाठी गेले होते. यावेळी एक महिला बुडत असल्याचे कुटुंबाच्या निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत ती मृत झाल्याचे लक्षात आले.

दरम्यान घटनेनंतर अग्निशमन आणि पोलीस दलास कळविण्यात आले. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल पोहचल्यानंतर तब्बल दोन ते अडीच तासाच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार बोंबले करत आहेत.