‘एक नवाब, सौ जवाब’, मलिकांच्या समर्थनार्थ युवक राष्ट्रवादी रस्त्यावर

नाशिक । प्रतिनिधी

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. “एक नवाब, सौ जबाब” , “ना डरेंगे, ना झुकेंगे” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी पहाटे पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी घराची झडती घेत चौकशीला सुरवात केली. अधिकाऱ्यांच्या चौकशीला पूर्णपणे सहयोग देऊन सुद्धा केंद्र सरकारच्या सूडबुद्धीमुळे अंडरवर्ल्डशी संबंध व मनी लॉंड्रिग या आरोपाखाली राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली.

ईडी ने १५ फेब्रुवारी रोजी मुंबईत छापे टाकले होते. त्यामधून अंडरवर्ल्ड असलेला संबंध, कथित बेकायदेशीर खरेदी आणि मालमत्तांची विक्री, हवाला व्यवहार असे विविध आरोप त्यांच्यावर लावण्यात आले असून त्यांना देशद्रोही ठरवत असल्याचा केंद्र सरकारचा डाव हाणून पाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी नवाब मालिकांचे जोरदार समर्थन करत सांगितले.

यावेळी शादाब सय्यद, जय कोतवाल, बाळा निगळ, सागर बेदरकर, विशाल डोखे, राहुल कमानकर, कल्पेश कांडेकर, संतोष भुजबळ, निलेश सानप, डॉ.संदीप चव्हाण, विक्रांत डहाळे, हर्षल चव्हाण, प्रशांत नवले, रियान शेख, सुनिल घुगे, अक्षय पाटील, विशाल माळेकरसोनू कागडा, गणेश खोडे, संतोष गोवर्धने, शहाद अरब, हाशीम शहा, रवि शिंदे, मुनावर शेख आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.