नाशिकचं वैभव दाखवणारी टुरिस्ट व्हॅन पुन्हा रस्त्यावर

नाशिक । प्रतिनिधी
शहरातील आणि आसपासच्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी होऊ लागली असल्याचे लक्षात घेता नाशिक शहर पोलिसांनी येत्या पंधरवड्यात टुरिस्ट व्हॅन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या आधी नाशिक शहरात पर्यटनाच्या दृष्टीने हि पर्यटन व्हॅन सुरु करण्यात आली होती. मात्र कोरोना सुरु झाल्यानंतर तब्बल दोन वर्ष धूळखात पडून होती. आता पुन्हा शहर पर्यटकांनी बहरू लागले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्याने बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे लवकरच हि पर्यटक व्हॅन पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त पौर्णिमा -चौगुले यांनी दिली आहे. काही दुरुस्तीनंतर पर्यटक व्हॅन पुढील दोन आठवड्यांत लोकांच्या सेवेत दाखल केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. कोविड-19 च्या निर्बंधांमुळे शहरातील पर्यटन स्थळे जवळपास दोन वर्षांपासून बंद होती. पर्यटक व्हॅन दोन वर्षांपासून बंद असल्याने तिला सर्व्हिसिंग तथा इतर काही दुरुस्तीची कामे आणि टच-अपची गरज आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यावर व्हॅन पुन्हा कार्यान्वित होईल.

नाशिकमधील पर्यटनस्थळे, पांडवलेणी, सोमेश्वर मंदिर आणि धबधबा आणि पंचवटी परिसरातील इतर मंदिरे या ठिकाणी वर्षभर पर्यटक आणि यात्रेकरूंची सतत वर्दळ असते. चौगुले म्हणाले की, टुरिस्ट व्हॅन सुरू करण्यामागचा उद्देश शहरात नवीन येणाऱ्या लोकांना किंवा तीर्थक्षेत्रांबद्दल माहिती व्हावी, प्रवास सुरक्षित व्हावा, हा आहे. देशभरातून येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित सेवा देण्याचे काम नाशिकरांचे असल्याने हि सेवा पूर्वरत करण्यात येत असल्याचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले.

दरम्यान ही व्हॅन सुरु झाल्यानंतर या व्हॅनमध्ये एका महिला कॉन्स्टेबलसह दोन पोलिस कर्मचारी असणार आहेत. नाशिक तत्कालीन पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल असतांना साधारण पाच वर्षांपूर्वी टुरिस्ट व्हॅन सुरू करण्यात आली होती. या संकल्पनेला मोठ्या संख्येने पर्यटकांकडून दादही मिळाली होती.