Home » कोणत्याही निवडणुकीत भाजपाला जवळ करणार नाही

कोणत्याही निवडणुकीत भाजपाला जवळ करणार नाही

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

आगामी जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी करूनच लढविल्या जातील. कोणत्याही निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जवळ करणार नाही असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागून जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावे असे आवाहन पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी केले आहे. आघाडी करून निवडणूक लढविण्यासाठी स्थानिक पातळीवर अधिकार देण्यात येणार असले तरी देखील महाविकास आघाडीच्या वतीनेच निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे देखील ना.भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका व नगरपंचायत निवडणूकांच्या पूर्व तयारीसाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र पगार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन नाशिक येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोकहिताचे कार्यक्रम राबवावेत असे आवाहन देखील पालकमंत्री मा.छगन भुजबळ यांनी यावेळी बोलतांना केले. आगामी निवडणुकीत आपण सर्व ताकदीने निवडणुकीत उतरणार आहोत. पवार साहेबांच्या विचारानुसार महिला आणि युवकांना जास्तीत जास्त संधी देण्यात येईल. निवडणुकीची सुरुवात ही मतदार पडताळणी पासून सुरु होत असते. कारण बोगस मतदान करण्यासाठी काही पक्षांकडून मतदार याद्यांमध्ये नावे समाविष्ट केले जातात याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. मतदार यादीत किती खरे आणि किती खोटे मतदार आहेत याची पडताळणी करून मतदार नोंदणी करण्यात यावी. त्यासाठी आवश्यक असल्यास तक्रारी दाखल करण्यात याव्यात असे आवाहनही यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, ग्राम पातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यात येऊन आगामी ग्रामपंचायत, सोसायटी, बाजार समित्या, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व अन्य निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून पक्षाची ताकद वाढवावी. निवडणुकीला सामोरे जात असतांना आपापसातील मतभेद बाजूला ठेवावेत अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. यावेळी मंत्री ना.छगन भुजबळ यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक परिस्थितीचा आढावा घेत पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली.

खा.शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने दि. ७ डिसेंबर पासून सर्व तालुक्यात कार्यकर्ता मेळावे घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र पगार यांनी यावेळी बोलतांना सांगितले. तसेच दि. १२ डिसेंबर या वाढदिवसाच्या दिवशी तालुकावार व्हर्चुअल रॅली काढण्यात येणार आहे. तर दि. १४ डिसेंबर पासून तालुकावार विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार असल्याचे देखील पगार यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष ना.नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड, माजी आमदार जयंत जाधव, कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, मुंबई बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, माजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, महिलाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!