नाशिक । प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिका निवडणुकीकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांची चाचपणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सुरु केली आहे. पहिल्या टप्प्यात सिडको विभागातील इच्छुक उमेदवारांची चाचपणी कुबेर लाँन्स जुने सिडको येथे घेण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, माजी आमदार डॉ.अपूर्व हिरे, विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गिते, मकरंद सोमवंशी, दत्ताकाका पाटील, संजय खैरनार आदींनी उमेदवारांची चाचपणी केली.
नाशिक महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे. या प्रभाग रचनेच्या आधारावर प्रभाग निहाय इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सुरवात केली आहे. प्रभागातील आरक्षण अद्याप जाहीर झाले नसले तरी संभाव्य आरक्षण व महिला आरक्षण लक्षात घेता चाचपणी करण्यात आली.
यावेळी ३०० इच्छुक उमेदवारांची चाचपणी पार पडली. प्रभाग रचना ही पूर्णतः वेगळी असल्याने विद्यमान नगरसेवक एकमेकांसमोर उभे राहणार असल्याचे चिन्ह आहे. या मध्ये राष्ट्रवादीचा फायदा कसा करता येईल याविषयी चर्चा झाली आहे. इतर पक्षातील उमेदवार व राष्ट्रवादी पक्षातील उमेदवार यांच्यातील तुलना यावेळी करण्यात आली.
प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले म्हणाले की, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्याकरिता सर्वाधिक निधी आणला हा इतिहास कोणीही पुसू शकत नाही. भुजबळांनी केलेले विकास कामे जनतेसमोर मांडून महापालिकेवर सत्तेत येण्याची हीच खरी वेळ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. माजी आमदार डॉ.अपूर्व हिरे यांनी भाषणात सांगितले की, महापालिकेतील सत्ताधारी दत्तक नाशिकच्या विधानावरून सत्तेवर आले परंतु त्यांनी नाशिकवर तिळमात्र प्रेम दाखविले नाही. केंद्राकडून मेट्रोची घोषणा करण्यात आली.
राज्य सरकारच्या वाट्याचा निधी देऊन देखील केंद्राने त्यांच्याकडील निधीबाबतची घोषणा केलेली नाही. नाशिकमध्ये गेल्या पंचवार्षिक पासून सिडको-सातपूर मध्ये नविन कंपनी आलेली नाही आणि तसे प्रयत्न मनपा सत्ताधाऱ्यांनी केले सुद्धा नाही. नाशिकमध्ये नवीन उद्योजकांना आणण्याकरिता व नाशिकच्या सर्वागीण विकासाकरिता नाशिक महापालिकेवर सत्ता येणे गरजेचे असल्याने सर्वांनी कामाला लागण्याचे आवाहन यावेळी उपस्थितांना केले.