नाशिक । प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्याचा तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून निफाड येथे सर्वात कमी किमान तापमान ६.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. निफाडमध्ये यंदाच्या हंगामातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद सकाळी झाली आहे.
राज्याचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाडमध्ये थंडीचा कडाका वाढला असून, जिल्ह्यातही थंडीने नागरिकांवर कुडकुडण्याची वेळ आली आहे. तर नाशिक शहरांत मॉर्निंग वॉकला जाणारे लोक स्वेटर, शाली आणि मफलर गुंडाळून बाहेर पडत आहेत. त्यातच निफाडच्या पारा घसरल्याने अधिकच थंडी जाणवू लागली आहे. सकाळी, सायंकाळी जिल्ह्यात गप्पांचा फड शेकोटीवर पहायला मिळत आहे.
मागील वर्षी १२ नोव्हेंबर २०२ ला ८.५ नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली होती. यंदाच्या हंगामात आज ६.५ नीचांकी तापमानाची नोंद कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात झाली आहे. तालुक्यात सातत्याने पारा घसरत असल्याने तालुक्यातील मोठ्या प्रमाणात द्राक्षबागा असलेल्या असलेल्या चांदोरी, सायखेडा, निफाड, पिंपळगाव, कसबे सुकेने, विंचुर ही गावे थंडीने गारठून गेली आहे. या थंडीचा द्राक्ष बागेला धोका पसरू नये म्हणून शेतकरी वर्गाची धावपळ सुरू झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात दरवर्षी थंडीची काही औरच मजा असते. यंदाही ओठ थरथरावणारी थंडी अनुभवयास मिळत आहे. तर दुसरं असं कि, यंदा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. तर दिवाळीच्या सुमारास अतिवृष्टी देखील झाली होती. ज्यामुळे जिल्ह्याची पाणी पातळी देखील वाढली आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक झाली आहे. अनेक प्रकल्प पूर्णपणे भरलेले आहेत. ज्यामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात पाणी देण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हयात थंडीचा कडाका अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे.