जऊळके येथे नायट्रोबेंझिनचा साठा जप्त

नाशिक । प्रतिनिधी

कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागाने जिल्ह्यातील दिंडोरी येथे छापा टाकून प्रतिबंधित असणाऱ्या नायट्रोबेंझीनचा साठा जप्त केला आहे. हा छापा काल रात्री टाकण्यात आला असून आज सकाळी साठ्याची पुढील तपासणी करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नाशिक जवळील ओझर येथील दहावा मैलापासून जवळ असलेल्या जऊळके ता. दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये प्रतिबंधित असलेला रसायनाचा साठा एका कंपनीकडे करण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारावर नाशिक रोड येथील कृषीविभागातील गुणनियंत्रण विभागातील निरीक्षक व त्यांच्या पथकाने काल रात्री दिंडोरी येथील संजय जोशी नामक व्यक्तीच्या कंपनीत अचानकपणे छापा टाकून तपासणी केली.

यावेळी नायट्रोबेंझीन हे प्रतिबंधित असणारे रसायन जप्त केले आहे. काल रात्री ही कारवाई केल्यानंतर हा संपूर्ण साठा सील करण्यात आला. आज सकाळी विशेष तज्ञ पथक घेऊन या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी या ठिकाणी तपासणी सुरू करण्यात आल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.