सिव्हिलजवळ पैसे वाटत असल्याचे सांगून एक लाखांना गंडा

नाशिक | प्रतिनिधी
भद्रकाली कापड बाजारात खरेदीसाठी आलेल्या वृद्ध भाऊ बहिणीला एका वीस वर्षीय तरुणाने गंडा घातल्याची घटना घडली आहे. त्यांच्याकडून सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मुंनतंजीम मुल्ला हे त्यांच्या बहिणीसह खरेदीसाठी भद्रकाली परिसरात गेले होते. यावेळी एका तरुणाने नातेवाईकांच्या ओळखीचे असल्याचे सांगत त्यांच्याशी बोलायला सुरवात केली. काही वेळानंतर त्यांचा विश्वास संपादन करीत जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांना पैसे वाटप केले जात असल्याचे त्या दोघांना सांगितले.

यानंतर मुल्ला यांना विश्वास बसल्याचे लक्षात येताच त्याने त्या दोघांना जिल्हा रुग्णालयात आणले. येथे या दोघांना एकमेकांपासून वेगळे करत दोघांकडून सुमारे एक लाख १२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, रोकड व काही कागदपत्रे काढून घेत धूम ठोकली.

दरम्यान काही वेळानंतर मुल्ला यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले मात्र वेळ निघून गेली होती. त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.