अवकाळीमुळे पुन्हा बळीराजा अडचणीत!

येवला | प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात आज सकाळपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, द्राक्ष पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजावर आर्थिक संकट ओढवले आहे.

दरम्यान हवामान विभागाने वर्तविलेला पावसाचा अंदाज खरा ठरला असून डिसेंबर च्या पहिल्याच दिवशी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे. येवला तालुक्यातील कांदा हे मुख्य पीक असल्यामुळे पिकाला मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसू शकतो. काढणीला आलेला लाल कांद्याचे मोठे नुकसान होऊन मोठ्या आर्थिक संकटाला बळीराजाला सामोरे जावे लागणार आहे. याच प्रमाणात नवीन लागवड केलेला उन्हाळ कांदा देखील या पावसामुळे मर, सड, कुज आदी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येथील कांदा उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.

तर तालुक्यातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना देखील मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण आणि पाऊस यांचे समीकरण झाल्यास द्राक्ष पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कांदा व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची अवकाळी पावसामुळे चांगलीच चिंता वाढली आहे.

मुख्य पीक हे कांदा असून त्यावर पूर्णपणे वर्षभराची भिस्त असते. परंतु अवकाळीमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान होत आहे. नवीन लागवड केलेला कांदा खराब होण्याची चिन्ह असून प्रशासन व सरकारने तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

  • श्रावण पाटील देवरे, अध्यक्ष शेतकरी संघटना येवला.

मका व सोयाबीन पिकाला पाहिजे, त्या प्रमाणात भाव मिळत नसल्यामुळे तालुक्यातील शेतकरी कांदा पिकवण्यासाठी जिवाचं रान करत असतो. मात्र अशा नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे खच्चीकरण होते. परिणामी बाजारपेठांमध्ये शेतमालाला किंमत मिळत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात कांदा पीक हे आमच्यासाठी वरदान असू शकते की मोठे आर्थिक संकट असा यक्षप्रश्न आमच्यासमोर पडला आहे.

  • वसंतराव झांबरे, प्रगतशील शेतकरी शेवगे