सावधान! १५ रुपये पाठवणे पडू शकते महागात !

नाशिक | प्रतिनिधी

कुरियरच्या माध्यमातून आलेले कागदपत्रे मिळवण्यासाठी ऑनलाईन पैसे पाठवण्याच्या प्रकरणात अज्ञात इसमाने वृद्धाच्या बँक खात्यातील सुमारे लाख रुपये परस्पर काढून घेतल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार वामन नामदेव गायकवाड (वय६३, राजमाता जिजाऊ मार्ग तिडके कॉलनी नाशिक) यांना (दि.१९ मार्च) रोजी प्रोफेशनल कूरियरच्या संपर्क नंबर वरून अज्ञात इसमाने फोन केला. तुमचे पार्सल घेऊन आमचे कुरियर कर्मचारी तुम्ही दिलेल्या पत्त्यावर गेले होते. मात्र तेथील घराला लॉक असल्याने परत आले. त्यामुळे तुम्हाला कागदपत्र पुन्हा पाठवायची असतील तर १५ रुपये अधिक चार्ज द्यावा लागेल. त्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर पैसे पाठवा. त्यानुसार गायकवाड यांनी अज्ञात इसमाने दिलेल्या नंबर वर फोन पे वरून पैसे पाठवले. मात्र ट्रांजेक्शन कॅन्सल नाही त्यानंतर गायकवाड यांना पुन्हा कॉल आला. त्यांनी पुन्हा पैसे पाठवण्यास सांगितले, मात्र त्यानंतरही ट्रांजेक्शन कॅन्सल झाले.

या दरम्यान अज्ञात इसमाने गायकवाड यांच्या बँक खात्यातून सुमारे ९९ हजार ९९९ रुपयांची रक्कम काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरवातीला १९ हजार ९९९ रुपये, ४० हजार , ४० हजार अशा पद्धतीने एकूण ९९ हजार ९९९ रुपये बँक खात्यातून काढले.

बँक खात्यातून पैसे काढल्याचा मॅसेज गायकवाड यांना आल्यांनंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. लागलीच त्यांनी पोलीस स्टेशन गाठत घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक चंद्रकांत अहिरे करत आहेत.