आदिवासी विकास परिषदेचे लकी जाधव यांना काँग्रेसकडून मोठी संधी : थोरात

नाशिक । प्रतिनिधी

आजच्या मेळाव्याने आदिवासीं युवकांचे नेतृत्व म्हणून लकी जाधवकडे पहिले जाते. तसेच अशा पद्धतीने लोकांना एकत्र करण्याचे काम तो करीत असल्याने पुढील काळात काँग्रेस लकी जाधव यास चांगली संधी देईल, असे ठाम मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे येथील गायकवाड सभागृहात आयोजीत राज्यस्तरीय आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, आमदार डॉ सुधीर तांबे,आमदार हिरामण खोसकर, माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, वत्सला खैरे, आयोजक नगरसेवक राहुल आहेर, लक्ष्मण जाधव, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड विनायक माळेकर, आशा तडवी आदी उपस्थित होते.

गेल्या दोन तीन वर्षांपासून लकी जाधव नाशिकसह धुळे, नंदुरबार आदी आदिवासी जिल्ह्यात आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून समाजाचे काम करीत आहे. त्यामुळे युवकांना त्याने एकत्र केले असून चांगली फळी निर्माण केल्याचे थोरात यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात नाशिक जिल्ह्यातून लकी जाधव यास काँग्रेस चांगली संधी देईल यात शंका नाही. असेही ते यावेळी म्हणाले. पुढे म्हणाले कि, राज्यातील आदिवासींना कॉंग्रेसने भरभरून दिले असून तेवढेच प्रेम केले व करतही आहे. जेव्हा जेव्हा कॉंग्रेस पक्ष अडचणीत होता,तेव्हा आदिवासींनीच कॉंग्रेसला ताकद देण्याचे काम केले आहे.

इंदिरा गांधी, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांचाही आदिवासींचा विकास हाच ध्यास कायम राहिला आहे. आदिवासींच्या प्रश्नांबाबत पक्षाकडून ज्या उणीवा राहिल्या आहेत त्या दूर करून, आदिवासींच्या पाठीमागे कॉंग्रेस ताकदीनिशी उभा राहील. आदिवासींच्या प्रलंबित सर्व प्रश्नांसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे बैठक आयोजीत करून सर्व प्रश्नांवर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.

सदर मेळाव्यास प्रदेश पदाधिकारी राजाराम पानगव्हाणे, भारत टाकेकर, अ‍ॅड. संदीप गुळवे, प्रसाद हिरे, सुरेश मारू, वसंत ठाकूर, ज्ञानेश्वर काळे, जनार्दन माळी, सुनील आव्हाड, निलेश खैरे आदी उपस्थित होते. प्रारंभी आदिवासींची नृत्य सादर करण्यात आली. समाजातील विशेष कामगिरी करणाºयांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रस्ताविक लक्ष्मण जाधव यांनी केले तर, राहुल दिवे यांनी आभार मानले.

आदिवासींना न्याय देणार
सध्या बोगस आदिवासींचा मुद्दा ऐरणीवर आहे. बोगस आदिवासींना काढून खऱ्या आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका अनेकदा मांडली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे लवकरच बैठक घेऊन, हा निर्णय मार्गी लावण्यासाठी आपण बांधील आहे, अशी ग्वाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.