नाशिक । प्रतिनिधी
पोलीस भरती २०१९ मधील रिक्त असलेल्या ५ हजार २९७ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून निवडलेल्या उमेदवारांना लवकरच नेमणुका देण्यात येणार आहेत. त्याशिवाय येत्या काही दिवसात ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत केली.
पोलीस भरती २०१९ मधील रिक्त असलेल्या ५ हजार २९७ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या काही दिवसात यातील पात्र निवडलेल्या उमेदवारांना नेमणुका दिल्या जातील असे सांगून येत्या काही दिवसात ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती करण्यात येणार आहे, मंत्रीमंडळाने या भरतीला मान्यता दिली असून कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असेही गृहमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.
पोलीस शिपाई निवृत्तीच्या वेळी पीएसआय होणार
पोलीस सेवेत शिपाई म्हणून रुजू झालेल्या कर्मचाऱ्यास निवृत्त होताना ३० वर्षे सेवा केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकपदी कालबद्ध पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला असून पोलीस शिपायांना आता निवृत्तीच्या वेळी पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळेल, असेही गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांनी सांगितले.
१३८ विशेष जलदगती न्यायालये सुरु करण्यास मान्यता
बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पॉक्सो) अंतर्गत दाखल गुन्ह्यांसाठी १३८ विशेष जलदगती न्यायालये सुरु करण्यास मान्यता दिली आहे, हे सांगतानाच, गृहरक्षक दलाच्या जवानांना वर्षभरात १२० ते १५० दिवस काम देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अर्थ विभागाकडे प्रस्ताव पाठविल्याचेही गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांनी सांगितले.
लवकरच तलाठी भरती होणार
तसेच राज्यात लवकरच तलाठी भरती होणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत दिली आहे. तलाठय़ांच्या जागा मोठय़ाप्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन ३,१६५ तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठय़ांची भरती करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी विधानसभेत दिली.