नाशिक । प्रतिनिधी
नो हेल्मेट नो पेट्रोलच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र गेल्या दोन तीन दिवसापासून खुनाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने हा पोलीस बंदोबस्त काढण्यात आला आहे.
दरम्यान मागील काही दिवसांत शहरांत तीन खून झाले आहेत. या खून सत्रामुळे शहरांत दहशतीचे वातावरण आहे. एकीकडे शहरात गुन्हेगार हैदोस घालत असताना दुसरीकडे मात्र पोलीस यंत्रणा पेट्रोल पंपावर कार्यरत आहे. नो हेल्मेट नो पेट्रोलच्या धर्तीवर नाशिक पोलीस नागरिकांना तपासण्यात व्यस्त आहे. त्यामुळे अनेक पोलीस कर्मचारी पेट्रोल पंपावर तपासणीसाठी होते. मात्र आता हेल्मेट तपासता तपासता गुन्हेगारीकडे दुर्लक्ष झाल्याचे पहायला मिळत आहे. यावरून नाशिक पोलिसांवर टीकेची झोड उठवली होती.
एकीकडे गुन्हेगारांचा हैदोस तर दुसरीकडे पोलीस पेट्रोल पंपावर व्यस्त असल्याने वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष कोण घालणार? त्यामुळेच पेट्रोल पंपावर पोलीस मात्र रस्त्यावर गुन्हेगारांचा हैदोस, अशा प्रकारची टीका सुरू झाली. अखेरीस पोलीस आयुक्तांनी पेट्रोल पंपावरील पोलिस बंदोबस्त काढणार असून रस्त्यावरील पोलिसिंग साठी भर देणार असल्याचे सांगितले आहे. मात्र अद्याप पोलीस आयुक्तालयातर्फे पंपावरील मनुष्यबळ कमी करण्याचा आदेश काढण्यात आलेला नाही. मग आता, हेल्मेट नसेल तरीही पेट्रोल मिळणार का? का यावरून वाद होणार ? हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे.