राजकारण सुरु राहील, ओबीसींवर अन्याय होऊ देऊ नका : भुजबळ

नवी दिल्ली । प्रतिनिधी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी ओबीसी आरक्षण ( OBC Reservation) विधेयकावर का सही केली नाही, याचे उत्तर स्वतः मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिले आहे. राज्यपालांचा गैरसमज झाला असून, त्यामुळेच त्यांनी सही करायला नकार दिला आहे. त्यामुळे आता दोन-तीन मंत्र्यांना घेऊन त्यांना भेटणार आहे, असे संकेतही त्यांनी दिले.

गेल्या अनेक दिवसांपासून ओबोसी आरक्षणा संदर्भात राजकरण तापले आहे. यामुळे मंत्री भुजबळ वेळोवेळी पाठपुरावा करताना दिसत आहेत. दरम्यान राज्यपाल कोश्यारी नाशिक दौर्यावर आले असता भुजबळांनी याबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. याविषयी भुजबळांना विचारले असता भुजबळ म्हणाले की, आपण अगोदर ओबीसी अध्यादेश तयार केला होता. आयोग नेमून कामाला तयार झालो. त्या अध्यादेशावर राज्यपाल यांची सही झाली होती. तो एकमताने मंजूर ही करण्यात आला होता. त्याला सुप्रिम कोर्टाने विरोध केला नाही. तर तेव्हा इम्पिरिकल डाटा मागितला होता. त्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला होता. तेव्हा भाजपनेही सपोर्ट केला होता, असा दावा भुजबळांनी केला. आता या प्रकरणात राज्यपालांचा गैरसमज झाला आहे. त्यामुळे त्यांनी सही करायला नकार दिल्याचे ते म्हणाले.

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांशी बोललो आहे. देवेंद्र फडणवीसांसोबत बोलणार आहे. शेवटी हा राज्यातील 7 ते 8 कोटी ओबीसींचा प्रश्न आहे. मुंबईला गेल्यानंतर दोन – तीन मंत्र्यांना घेऊन राज्यपालांना भेटणार आहे. राजकारणाचा विषय वेगळा असतो. 12 आमदार इकडे – तिकडे तो भाग वेगळा आहे. मात्र, हा सार्वत्रिक विषय आहे. त्यामुळे ओबीसींचे नुकसान होईल, असे अडथळे निर्माण करता कामा नये, असे आवाहनही त्यांनी केले.

भुजबळ म्हणाले की, तेव्हा भाजपनेही सपोर्ट केला होता. मात्र, आता ओबीसीवर अन्याय होईल असं करू नका. या विषयात राजकारण करू नये. मला आशा आहे की, राज्यपाल महोदय हा विषय समजून घेतील. निवडणुका डोक्यावर आहेत. ओबीसी आरक्षण मिळावं असे वाटते. मी भेट घेतली तेव्हा हे प्रकरण माहिती नव्हतं. त्यामुळे चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.