नाशिक | प्रतिनिधी
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील स्वरूपेश्वर बाणेश्वर महादेव महादेव मंदिर येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर या महादेव मंदिराला ‘प्रतीकेदारनाथ’ म्हणून सध्या प्रसिद्धी मिळत आहे.
नाशिक जिल्ह्याला प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्यामुळे विविध प्राचीन मंदिरांसह विविध गडकिल्ल्यांचे वैभव पाहायला मिळते. त्यातच आता त्र्यंबकेश्वर येथील प्रतिकेदारनाथ या मंदिराचा समावेश झाला आहे. त्यामुळे येथे भाविकांसह पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते आहे.
पुणे येथील श्रुतीसागर आश्रमाच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वरच्या वाढोली येथे शिवशक्ती ज्ञानपीठाच्या आश्रमात श्री रूपेश्वर बाणेश्वर महादेव मंदिर उभारण्यात आले आहे. मात्र हे मंदिर केदारनाथ या प्रसिद्ध मंदिरासारखे दिसत असल्याने त्याला प्रतिकेदारनाथ म्हणून ओळख निर्माण होऊ लागली आहे.
दरम्यान २०१४ साली या मंदिराचे लोकार्पण झाले असून काही दिवसांपूर्वीच हे मंदिर खुले झाले आहे. या मंदिराविषयी भाविकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळत असल्याने येथे गर्दीचा ओघ वाढला आहे. माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांच्या संकलपनेतून या मंदिराची संकल्पना पुढे आली आहे. अंजनेरी पर्वत रांगांमध्ये जवळजवळ ४ एकर जागेत साकारलेल्या या मंदिर परिसरात भक्तनिवास, भगवंतपूज्यपाद, आदी शंकराचार्य आश्रम, दुर्गा परमेश्वर मंदिर पर्यटनाचे केंद्गारबिंदू ठरत आहे.
या ठिकाणी प्रत्येक महिन्याला वेद, वेदांत शिबीर घेण्यात येते. तर मोठा नित्य अन्नदानाचा कार्यक्रम देखील याठिकाणी पार पडत असतो. साधनेसाठी अनुकूल स्थान असल्याने याठिकाणी अनेक साधू संत देखील येतात. तर केवळ नाशिकच नव्हे तर मुंबई, पुण्याहून देखील भाविक या ठिकाणी येत आहे. मंदिराचे छायाचित्र, व्हिडिओ सोशल माध्यमांवर वायरल झाल्यानंतर प्रति केदारनाथ म्हणून या मंदिराकडे भाविक आकर्षित झाले असून महाराष्ट्रात असे पहिलेच मंदिर असल्याची माहिती येथील पंढरीनाथ महाराज यांनी दिली आहे.