नायलॉन मांजा विक्री करणारे दोघे तडीपार

नाशिक | प्रतिनिधी

शहरात नायलॉन मांजा व चायनीज मांजावर बंदी असताना साठा, विक्री आणि वापर केल्याप्रकरणी नाशिक शहरातून दोघांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक पोलिसांकडून नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मोहीम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात दोन तीन दिवसांपूर्वी मांजा विक्रेत्यास तडीपार करण्यात आल्याने मांजा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र तरी देखील मांजा विक्री चालू होती.

दरम्यान पुन्हा एकदा शहरातील दोन मांजा विक्रेत्यांविरुद्ध नाशिक पोलिसांनी कारवाई केली असून दोघांना तडीपार करण्यात आले आहे.
नायलॉन मांजा विक्री करण्यास बंदी असतानाही दोघे छुप्या पद्धतीने विक्री करत होते. या दोघांना १५ दिवसांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

नायलॉन मांजा पक्षी व नागरिकांसाठी जीवघेणा आहे. मांजामुळे अनेक पक्षी व नागरिकांचा बळी गेला असून, शेकडो पक्षी व नागरिक जखमी झाले आहेत. यंदा मकर संक्रांत निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी ४ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत नायलॉन मांजासह काचेची कोटींग असलेला व टोकदार चायनीज मांजाची निर्मिती, विक्री, साठा व वापर करण्यास बंदी घातली आहे.