नाशिक | प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची रखडलेली पदोन्नती मार्गी लागली असून, त्यात नाशिकच्या तीन पोलीस अधिकाऱ्यांना आता आयपीएसपदी प्रमोशन मिळाले आहे.
दरम्यान या अधिकाऱ्यांमध्ये नाशिक एसबीचे अधीक्षक सुनील कुडासने, पोलीस उपायुक्त अमोल तांबे आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड व माजी पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांचा समावेश आहे.
केंद्र सरकारने राज्यातील एकूण १४ अधिकाऱ्यांना आयपीएसची पदोन्नती दिली आहे. खरे तर २००० ते २००४ वर्षात महाराष्ट्र पोलीस दलात उपायुक्त म्हणून रुजू झालेल्या अधिकाऱ्यांचे प्रमोशन गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित होते. केंद्र सरकारने २०१९ आणि २०२० मध्ये आयपीएसची यादी जाहीर न करता तशीच ठेवली होती. त्यामुळे ही बढती रखडली गेली होती.
अखेर काल मकरसंक्रांतीच्या दिवशी या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश येऊन धडकले. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांची मकरसंक्रांत गोड झाली, अशी प्रतिक्रिया नाशिक पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये होती.
माजी उपायुक्त आणि सध्या बांद्रा येथील उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी, उपायुक्त अमोल तांबे, संजय बारकुंड, श्रीकृष्ण कोकाटे, एस. पी. निशाणदार, संजय लाटकर, सुनील भारद्वाज, एन. ए. अष्टेकर, मोहन दहिकर, विश्वास पानसरे, पी. एम. मोहिते, वसंत जाधव, श्रीमती एस. पाटील आदी एकूण चौदा अधिकाऱ्यांची बढती झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हे अधिकारी इतर ठिकाणी जाणार की आहे, त्याच ठिकाणी सेवा बजावणार याकडे लक्ष लागले आहे.