नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या

येवला । प्रतिनिधी

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विशेष आर्थिक भरीव मदत द्यावी या आशयाचे निवेदन येथील अखिल भारतीय युवक मराठा महासंघाच्या वतीने तहसीलदार प्रमोद हिले यांना देण्यात आले आहे.

येवला तालुक्यात अवकाळी मुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत आहे. त्याच प्रमाणे जनावरे देखील दगावली आहेत. यामुळे शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आला आहे. शेतकरी आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडल्यामुळे शेतकऱ्याला अस्मानी व सुलतानी अशा मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. याचमुळे येथील अखिल भारतीय युवक मराठा महासंघाच्या वतीने तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन दिले आहे.

तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी यांचे या सततच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात कांदा हे पीक प्रामुख्याने घेतले जाते परंतु आज जवळपास 60 टक्के लाल कांदा काढणीला आला असून पावसामुळे काढणीला आलेला कांदा सडून जाण्याच्या परिस्थीतीत आहे. तर नवीन 25 टक्के लागवड झालेला उन्हाळ कांदा सतत पाण्यात भिजत आहे. त्यामुळे उन्हाळ कांद्याचे भवितव्य देखील आजच अंधारात दिसत आहे, आजपर्यंत भरपूर खत व औषधाचा देखील मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. या सततच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आपण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष मदत द्यावी अशी मागणी निवेदनातून अखिल भारतीय युवक मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत तहसीलदार यांनी कृषी विभाग व संबंधित यंत्रणेशी बोलून आपल्या निवेदनावर विचार केला जाईल व कांदा उत्पादक शेतकऱ्याला कसा न्याय दिला जाईल याचा विचार आम्ही प्रशासन पातळीवर करू असे आश्वासन येथील पदाधिकाऱ्यांना तहसीलदार प्रमोद हिले यांनी दिले. यावेळी युवक मराठा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष पांडूरंग शेळके, तालुका अध्यक्ष सागर वाघ, शहर कार्याध्यक्ष संकेत शिंदे ,अंदरसुल गट प्रमुख भाऊसाहेब सोमासे,गणेश लहरे, विजय चव्हाण, गणेश चव्हाण, प्रदीप भोरकडे यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

तालुक्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते, परंतु यावर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. सततच्या पावसामुळे लाल कांदा पूर्णता खराब झाला असून उन्हाळ कांद्याची रोपे देखील जमत नसल्यामुळे उन्हाळ कांद्याचे देखील भविष्य आजच अंधारात दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत जाहीर करावी व तात्काळ द्यावी.

  • पांडुरंग शेळके पाटील जिल्हा कार्याध्यक्ष, युवक मराठा महासंघ