नाशिक । प्रतिनिधी
शालीमार परिसरात सोमवारी महापालिकेचे अतिक्रमण पथक कारवाई करत असतांना स्थानिक हॉकर्स आणि मनपा कर्मचाऱ्यांमध्ये हमरी तुमरी झाली. पोलिसही महापालिकेेच्या कारवाईला मदत करण्यासाठी पोहोचले मात्र काही काळ तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले.
गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरात पालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरु आहे. काल दुपारच्या सुमारास येथील शालिमार परिसरातील आंबेडकर चौक येथे अतिक्रमण पथक पोहचले. अतिक्रमण कारवाई सुरू करणार तोच दुकानमालकांकडून आणि हॉकर्स कडून कारवाईस विरोध झाला. मात्र या ठिकाणी मनपा कर्मचारी आणि हॉकर्स मध्ये बाचाबाची झाली. यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण झाले.
दरम्यान परिस्थिती हाताबाहेर पोहोचत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी शहरातील स्थानिक पोलिस ठाण्यांचे पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला दुकानमालकाने कारवाईस विरोध केला. पोलीस असतांना अतिक्रमण सुरु झाल्यानंतर हॉकर्स आडवे झाल्याने देखील वाद झाले. काही दुकानदारांनी कारवाई रोखण्याची पोलिसांना विनंती केली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान या घटनेविषयी श्रमिक सेनेचे चिटणीस भूषण कासार म्हणाले की, आंबेडकर चौक परिसरात कारवाई चालू असताना आम्ही त्यांना विरोध केला. कारण हा परिसर अधिकृत झोन मध्ये येत असूनही त्यांनी कारवाई केली. त्यामुळे सदर कारवाईस विरोध केला. तरीदेखील येथील काही साहित्य मनपा कर्मचाऱ्यांनी उचलून नेले. याबाबत विभागीय अधिकाऱ्यांशी बोलणे झाले, उपायुक्त अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जर साहित्य अधिकृत झोन मध्ये येत असेल तर ते परत करून देणार असल्याचे सांगितले.