नाशिक । प्रतिनिधी
देशातील पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल आले असून यात चार राज्यात भाजपने विजय संपादन केला असून देशभरात विजयी जल्लोष साजरा करण्यात येत आहे. तर विधानसभा निवडणूक निकालांवर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी आपण विनम्रतेने हा जनादेश स्वीकारत असल्याचे म्हटलं आहे.
या पाचही राज्याच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून राहुल गांधी , प्रियंका गांधी तथा काँग्रेस नेते घेत असलेल्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. या पाचही राज्यात काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला आहे. या निकालानंतर प्रथमच राहुल गांधी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले कि, ‘जनतेचा निर्णय नम्रपणे स्वीकारला असून या निवडणुकीत विजय संपादन करणाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा. तसेच काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि स्वयंसेवकांचे त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आम्ही यातून शिकू आणि भारतातील लोकांच्या हितासाठी काम करत राहू’., असे त्यांनी म्हटले आहे.
उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा, पंजाब या पाच राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या. आज अवघ्या देशाचे लक्ष निकालापाकडे लागून होत. अखेर पंजाब वगळता इतर चार राज्यात भाजपने चांगली मुसंडी मारली असून विजय संपादन केला आहे. मात्र काँग्रेसला कुठेच बहुमत सिद्ध करता आलेले नाही. तर आपने पंजाब मध्ये चांगला विजय संपादन केला आहे.