नाशिक । प्रतिनिधी
नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सोमवार (दि. १३) नाशिक दौऱ्यावर आहेत. यात राज जनहित कक्ष व विधी विभाग मध्यवर्ती कार्यालयाचा उदघाटन समारंभास उपस्थित राहणार असून जाहीर प्रवेश कार्यक्रम देखील आहे.
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा दौरा महत्वाचा ठरणार आहे. नाशिकसह राज्यातील १८ महापालिकांच्या पंचवार्षिक निवडणूक होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पुणे पाठोपाठ नाशिकमध्ये राज ठाकरे सक्रिय झाले आहेत. काही वर्षांपूर्वी आपला गड असलेले नाशिक परत मिळवण्यासाठी राज ठाकरे यांनी आपली शक्ती पणाला लावली आहे.
दरम्यान आजच्या दौऱ्यात ते माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या घरी सांत्वन भेट देणार असून त्यानंतर शरवरी लथ यांच्या घरी भेट देणार आहेत. त्याचबरोबर राज ठाकरे आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी निवडणुकीबाबात चर्चा करण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांचे पुत्र युवा नेते अमित ठाकरे हे देखील नाशिक दौऱ्यावर होते. बहुदा नाशिकची जबाबदारी अमित यांच्याकडे सोपविण्यात आल्याने नाशिकमधील दौरे वाढविले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर तीन महिन्यांत राज यांचा चौथा नाशिक दौरा आहे.