राज ठाकरे यांचे उद्धव ठाकरेंना उद्देशून सूचक ट्विट.

By चैतन्य गायकवाड

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात चालू असलेल्या सत्ता संघर्षाला अखेर विराम लागल्याचे दिसत आहे. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS chief Raj Thackeray) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने, ते माध्यमांमध्ये फारसे दिसले नाही. तसेच त्यांनी राज्यातील या राजकीय घडामोडींवर फार काही भाष्य देखील केले नव्हते.

मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक ट्विट केले आहे. “एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चे कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो.” अशी पहिली प्रतिक्रिया राज यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाण्यापूर्वीच त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडले.

राज ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. मशिदीवरील अजानच्या भोंग्यावरून मनसेनं राज्यात मोठं आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेण्यात आले होते. पोलिसांनी हजारो कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या होत्या. काही कार्यकर्त्यांना तडीपार देखील करण्यात आले होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ‘राज्य सरकार बेभान होऊन वागत आहे. सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी येत नाही, उद्धवजी तुम्हीही नाही.’ असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावेळी उद्धव ठाकरे यांना दिला होता.

दरम्यान, राज्यातील राजकीय अस्थिरता दूर करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governer Bhagatsinh Koshyari) यांनी महाविकास आघाडी सरकारला ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यावर आक्षेप घेत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने काल रात्री ती याचिका फेटाळत राज्यपालांचे आदेश कायम ठेवले होते. त्यानंतर काही वेळातच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासोबतच विधान परिषद सदस्यत्वाचा (MLC) देखील राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती.