पुण्याला चकरा मारून हॉस्टेल नाही मिळालं, आज ‘फोर्ब्स’च्या यादीत !

नाशिक । प्रतिनिधी
बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील पिंप्री खंदारे (Pimpri Khandare) या अगदी छोट्या गावातील एका तरुणाची चक्क ‘फोर्ब्स’ने (Forbes list 2022) दखल घेतली आहे. राजू केंद्रे (Raju Kendre) असे या तरुणाचे नाव आहे. सामाजिक कार्य उद्यमशीलता श्रेणीत ‘फोर्ब्स’ने राजू केंद्रे यांची भारतातील तिशीच्या आतील तीस ‘प्रभावी तरुण व्यक्तिमत्त्वांच्या’ यादीत समावेश केला आहे. राजू केंद्रे केवळ 28 वर्षांचा आहे. सध्या तो ब्रिटिश सरकारच्या चेवनिंग स्कॉलरशिपवर लंडनमध्ये उच्चशिक्षण घेतो आहे.

राजू केंद्रे याची पार्श्वभूमी अत्यंत नाजूक आहे. घरामध्ये शिक्षणाचा कोणताही प्रदीर्घ अथवा उल्लेखनीय असा कोणताही वारसा त्याला लाभला नाही. अत्यंत हालाकीच्या स्थितीतून त्याने शिक्षणाची कास धरली. शिक्षण घेणारी त्याच्या कुटुंबातील त्याची पहिलीच पिढी आहे. जिल्हा परिषद शाळेतून त्याने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. आपण कलेक्टर व्हावे असे स्वप्न तो लहानपणापासून बाळगून होता. स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी तो पुण्यााल गेला. योग्य मार्गदर्शक नसल्याने त्याला अनेक चकरा मारुनही राहण्याची व्यवस्था आणि होस्टेल मिळू शकले नाही.

स्वप्नपूर्तीसाठी त्याने प्रयत्नांची पराकष्टा केली. पण तो पर्यंत फर्ग्युसन कॉलेजची तारीख निघून गेली. पुणे पुणे शहरात टीकाव धरण्यासाठी त्याने BPO सारख्या संस्थांमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिथेही त्याला म्हणावे तसे यश आले नाही. त्याला त्याच्या वैदर्भीय भाषेचा अडथळा आला. हताश झालेल्या राजुला निराश मनाने पुणे सोडावे लागले. आपल्या वाट्याला जे आले ते आपल्या समूहातील इतरांच्या वाट्याला येऊ नये यासाठी त्याने ‘एकलव्य’ नावाने एक प्लॅटफॉर्म तयार केला. दरम्यान, त्याने मुक्त विद्यापीठातही प्रवेश केला.

मुक्त विद्यापीठात शिकत असताना त्याला 2012 मध्ये मेळघाटला जाण्याची संधी मिळाली. त्याने आपल्या मित्रांच्या एका गटासोबत पूर्णवेळ दोन वर्षे काम केले. या काळात अदिवासी समूहासोबत त्याचा जवळून संबंध आला. त्यातून अस्वस्थ झालेल्या राजूची कलेक्टर होण्याची स्वप्ने गळून पडली आणि त्याने ग्रामपरिवर्तन चळवळीद्वारे स्वतःच्या गावातच काम करायचे ठरवले. आज एकलव्य या स्वतः स्थापन केलेल्या संस्थेतून आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना जागतिक कीर्तीच शिक्षण, बहुजन समाजातील युवक कसे घेऊ शकतील हीच त्यामागची मुख्य प्रेरणा-हेतू-उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.