नाशिक मनपाच्या आरोग्य विभागाच्या भरतीला मुहूर्त

नाशिक । प्रतिनिधी
शासनाने ३५ टक्क्यांची वित्तीय अट शिथिल करून आरोग्य विभागाच्या पदांची भरती करण्याची परवानगी दिली आहे. याबाबत नाशिक महापालिका सेवा प्रवेश नियम मंजूर करून घेण्यासंबंधित सूचना देण्यात आली आहे. त्यानंतर लागलीच या प्रवेश प्रक्रियेला सुरवात होणार असल्याची माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी पत्रकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले कि, सेवा प्रवेश नियमावली, सर्व पदाचा आकृतिबंध आणि मागासवर्गीय बिंदू नामावली असते, त्या नुसार विभागीय आयुक्तांकडून निश्चित केल्यानंतर जाहिरात दिली जाणार आहे. या दोन्हीसाठीच्या शैक्षणिक अहर्ता ठरविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तर बिंदू नामावली ठरविण्यासाठीचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे पाठविण्यात आला असून लवकरच याबाबत पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

मनपा आयुक्त पुढे म्हणाले कि, गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक परीक्षांत ज्या पद्धतीने काही घटना घडल्या. तर असे काही होणार नाही. यासाठी तातडीने आम्ही चर्चा करून शासनाच्या पॅनेलवर असणाऱ्या संस्था निवडणार आहोत. या संस्थेच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाईल. यामध्ये टाटा कन्सल्टन्सी, आयबीपीएस या दोन्हींना प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. या संस्था मनपाचा कुठलाही हस्तक्षेप न आणता निःपक्षपातीपणे काम करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील अनेक वर्षांपासूनचा रिक्त पदाच्या भरतीची प्रक्रिया खोळंबलेली होती. अखेर शासनाने ३५ टक्क्यांची वित्तीय अट शिथिल करून आरोग्य विभागाच्या पदांची भरती करण्याची परवानगी दिली आहे.