सत्यजित तांबे भाजपात जाणार नाहीत; दीपक केसरकर असे का म्हणाले?

बंडखोरीमुळे चर्चेत आलेले सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेशासाठी भाजपचे अनेक नेते आग्रही आहेत. भाजपचे दिग्गज नेते राधाकृष्णन विखे-पाटील यांनी स्वतः सत्यजित तांबे यांना पक्षात आणण्यासाठी आपण आग्रही असल्याचे स्पष्ट केले होते. त्यावर आता शिंदे गट मंत्री दीपक केसरकर यांनी सत्यजित तांबे हे भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपा प्रवेशामध्ये येणाऱ्या नियमाची अडचण असून सत्यजीत तांबे भाजपामध्ये जाणार नाहीत असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.

सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधरमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे वळले, वडील डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतरही सत्यजित तांबे यांनी हा अपक्ष अर्ज भरला आणि सुधीर तांबे यांना माघार घ्यावी लागली. तसेच यावेळी या निवडणुकीत भाजपने कुठलाही उमेदवार न देन ही भाजपची सत्यजित तांबे यांच्यासाठी पूरक भूमिका होती. त्यामुळे या बंडात भाजपचीच खेळी असल्याच्या चर्चा होत्या. तसेच भाजपचे नेते वारंवार सत्यजित तांबे यांना पक्षात येण्याबाबत विधान करतात त्यामुळे भाजप सत्यजित तांबे यांच्यासाठी आग्रही असल्याचे दिसते.

मात्र सत्यजित तांबे यांना भाजपमध्ये जाता येणार नसल्याचे दीपक केसरकर म्हणाले आहेत. ते म्हणाले, “सत्यजीत तांबे भाजपामध्ये जाणार नाहीत. मी एवढंच सांगितलं की तांबे कुठल्या पक्षात गेलेले नाहीत. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज केला आहे ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा तुम्ही विधानपरिषदेत अपक्ष म्हणून राहता, त्यानंतर तुम्ही कुठल्या पक्षात जाऊ शकत नाहीत. तुम्ही एखाद्या पक्षाला पाठिंबा देऊ शकता. तांबे निवडून येतील अशी मला १०० टक्के खात्री आहे.” असे दीपक केसरकर यावेळी म्हणाले आहेत.