नाशिक । प्रतिनिधी
विविध स्पर्धामधून गौरवल्या गेलेल्या आणि पारितोषिकांचा अक्षरशः वर्षाव झालेल्या सौंदर्य निर्मिती थिएटर नाशिकच्या च्या पाऊसपाड्या आणि बट बिफोर लिव्ह या दोन वेगळ्या धाटणीच्या एकांकिका प्रेक्षकांच्या खास आग्रहास्तव येत्या २६ फेब्रुवारी ला कालिदास कलामंदिरात येथे संध्याकाळी सहा वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
यात पहिल्या एकांकिकेत कॉमन वाटणाऱ्या एका अनकॉमन मॅन’ची म्हणजेच पाऊसपाड्याची गोष्ट आहे. जी संवेदनशील संवादातून उभी राहत मनोरंजनाबरोबरच एक चांगला संदेश देणारी अशी माणसातील गार वाऱ्याची गोष्ट आहे तर दुसऱ्या बट बिफोर लिव्ह हया एकांकिकेत आयुष्यात समाधानी राहण्यासाठी पैशांपेक्षा नात्यांची सोबत असणे किती गरजेची आहे आणि त्यासाठी नात्यात जितका स्वीकार महत्त्वाचा तितकाच त्यागही जमलाच पाहिजे हे सांगताना नात्यातील गैरसमजामुळे आयुष्याच्या वाटा कशा वेगळ्या होतात हे सांगणारी गोष्ट बघायला मिळेल.
ह्या आशय पूर्ण एकांकिकेतील आदिल शेख लिखित आणि आदिल शेख-अमित शिंगणे दिग्दर्शित पाऊसपाड्या तर उत्तम लबडे लिखित आणि अमित शिंगणे- वैभव जैस्वाल दिग्दर्शित बट बिफोर लिव्ह एकांकिका आहे.याशिवाय या एकांकिकांमध्ये तांत्रिक बाजू सांभाळणारे आणि अभिनय करणारे हे नाशिकचे स्थानिक कलाकार आहेत.
यानिमित्ताने नाशिकमध्ये खरा रसिक प्रेक्षक वर्ग तयार करण्याचे शिवधनुष्य सौंदर्य निर्मिती थिएटर, या संघाने उचलला आहे. प्रायोगिक रंगाभूमीला नवे वळण देणारे हे दोन्ही प्रयोग असतील अशी आशा सौंदर्य निर्मितीच्या प्रत्येक कलावंताला आहे. सर्व नाट्य रसिकांनी ह्या प्रयोगांना येण्याचे आवाहन सौंदर्य निर्मितीच्या वतीने करण्यात आले आहे. .